Monday, September 3, 2012

महागायकाचा झगमगाट


महागायकाचा झगमगाट
परवा रात्री टिव्हीवर सोनी वाहिनीवर इंडियन आयडॉल ६ चा अंतिम सोहळा पार पडला. गेले कित्येक दिवस मी सुद्धा या कार्यक्रमाचा श्रोता म्हणुन पहात होतो. पाहुणे कलाकार मधुर भंडारकर आणि करिना कपुर आले होते. कार्यक्रमाचे दिग्गज परिक्षक आशा भोसले, अन्नू मलिक, सलिम मर्चन्ट व सुनिधी चौहान यांची प्रतिभा आणि प्रतिमा सर्व कलाकारांना पारखुन निरखून घेत होती. अंतिम तिनही गायक उत्तम होते. कोणी ना कोणी जिंकणार होतंच. विपुल गुप्ताचं नाव अंतिम विजेता महागायक म्हणुन जाहीर करण्यात आलं. त्यानंतर मात्र बक्षिसांचा जणू पाऊसच पडला त्या विपुल गुप्तावर. रोख ५० लाखाचं व ३ लाखाचं बक्षिस, सुखुकी हयाते मोटरबाईक, निस्सानची चारचाकी गाडी, एका म्युजिक अलबमचा करारनामा. सारं कसं आलबेल. संयोजकांनी काही हातचं राखून न ठेवता विजेत्याला पुरस्कार बहाल केले होते. त्यालाच बक्षिसं मिळालं हा माझा आक्षेप नाहीये. तो विजेता आहे तो त्याचाच हक्क आहे, परंतू बक्षिसांची इतकी रेलचेल.....
आता त्यात नाविन्य असं काही राहिलच नाही. आज ही वाहीनी तर उद्या दुसरी...उद्या कोणी एक करोडचं बक्षिस देईल यात शंका नाही. पण ही जाहिरातबाजी नक्की कोणासाठी, तरूणांनाच्या गळ्याला भुरळ पाडणारे कार्यक्रम अशाच प्रकारे होत असतात. पण यातील विजेत्याचं नक्की भविष्य उजळतं काय? काही अपवाद असतील ही. प्रत्येक वाहिनीला टि.आर.पी नामक शिडीवर चढण्यासाठी अशा बक्षिसांची लयलूट करणं भागच असतं काय? पण त्यांच्या या अशा उधळपट्टीने समाजाचं असं काय भलं होणार आहे. मानलं की आपल्याला उत्तमोत्तम गायक मिळवून देण्याचं काम ह्या वाहिन्या करतात पण त्यामागे त्यांचा स्वार्थच असतो ना, कित्येक तरुण-तरुणी या आमिषांना भुलून मागे लागतात.
आपल्या देशाला कलेचं वरदान आहेच. या कला आत्मसात करण्यासाठी त्या कलेचं शिक्षण घेणं, त्यात प्राविण्य मिळवणं हे ध्येय असलं पाहिजे, स्पर्धा ह्या आपल्याला पारखण्यासाठी जरुर असतात पण त्या तुम्हीच एकमेव गायक हे ठरवू शकत नाहीत. कलेच्या साधनेचं महत्व तरूण पिढीने जरुर समजुन घ्यायला हवं पण त्याचं बाजारीकरण होता कामा नये........
दीपक साळुंके
०३-सप्टेंबर-२०१२

No comments:

Post a Comment