Thursday, August 30, 2012

॥ आनंद माझा ॥

॥ आनंद माझा ॥
परवा असच फ़िरताना पावसाची बारीक भुरभुर चालू होती, शांत एकाकी रस्ता आणि मी चालत चाललो होतो. एका वळणावर मला एक लोभसवाणं दृश्य पहायला मिळालं, एका झाडाखाली एक छत्री घेऊन दोन लहानगे भाऊ-बहीण आपल्या डब्यातून खाऊ खात होते. खात होते, एकमेकांना भरवत होते, मधुनच हसत होते, अधुनमधुन पावसाचं पाणी त्यांच्या अंगावर उडत होतं, पण ते जणू आपलं आयुष्य मजेने जगण्यात मश्गुल होते. किती आनंद ओसंडून वहात होता त्यांच्या चेह-यावरून, ना कसले दु:ख, ना चिंता, केवळ हसू. जवळच त्यांचे आई-बाबा आपल्या कामात गुंतलेले दिसले.
आणि मी हे दृश्य डोळ्यात सामावून निघुन गेलो पण ते एकसारखं माझ्या मनात रुंजी घालतच होतं. राहून राहून मला एक गोष्ट आठवत होती, काही वर्षापुर्वी मी आणि माझा धाकटा भाऊ, घरी आम्ही दोघेच होते. दिवसभरची कामे, जेवण आटपून आम्ही निजलो होतो. एका अर्ध्या तासानंतर अचानक वीज गेली. उकाड्याच्या दिवसांमधली ती रात्र असह्य व्हायला लागली होती. घामाने अंग भिजू लागलं होतं. खिडकी उघडली, दार उघडलं तरी वारा काही लागतच नव्ह्ता. त्यात माझ्या भावाला फ़ार उकडू लागलं होतं, तो बैचैन होऊन लोळू लागला होता. मी उठून एक पंचा घेतला आणि त्याचं घामेजलेलं अंग पुसून काढलं, तरी त्याची तगमग थांबेना मग त्या पंचाने मी त्याला वारा घालू लागलो तेव्हा कुठे तो व्यवस्थीत झोपला. मी वारा घालतच राहिलो, त्याच्या शांत निद्रिस्त चे-ह्याकडे मी पहात होतो आणि मला न जाणे कसलासा आनंद होत होता. मी त्याची झोपमोड होऊ दिली नव्हती. नकळतपणे त्या क्षणाने मला ख-या अर्थाने मोठा भाऊ बनवलं होतं.
आजही मला तो क्षण आठवला की तोच आनंद पुन्हा फुलून येतो. मला माझा भाऊ खुप आवडतो, माझं खुप प्रेम आहे त्याच्यावर, कधी बोललो नाही त्याला, पण आहे. आणि आज पहाटे माझ्या स्वप्नसरींची सुरुवात थोडी विचित्रच झाली, पण काही क्षणानंतर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे हातात हात घालून खुप खुप भटकत होतो, दोघेच रानावनातून, डोंगर द-यातून, घाटातून, समुद्र किना-यावरुन. त्या प्रवासातला प्रत्येक क्षण आम्ही साजरा करत होतो, त्यात विशेष म्हणजे आम्ही अणवानी होते. पुढे आम्ही त्याच्या एका मित्राच्या घरी गेलो आणि तिथेच आमचा प्रवास आणि स्वप्न थांबलं. ते थांबूच नये असं वाटत होतं.
मला क्रिकेटच्या खेळातला इरफान पठाण हा अष्टपैलू खेळाडू खुप आवडतो, याला कारण तो अष्टपैलू तर आहेच पण मला तो माझ्या भावासारखा दिसतो म्हणून. हे सर्व का लिहावसं वाटलं, ठाऊक नाही, पण या दोन क्षणांनी मला खुप आनंद दिलाय, आणि तो आनंद मी तेव्हा तेव्हा उपभोगला सुद्दा. पण हाच आनंद मला शद्बबद्ध करुन ठेवावा असा वाटू लागलं, त्यासाठीच.

दीपक....
३० ऑगस्ट २०१२